पुणे : पुण्यातील एका व्यक्तीला बँकॉकची मज्जामारी चांगलीच महागात पडली आहे. बायकोला आणि घरच्यांना न सांगता बँकॉकला जाऊन त्याने मज्जा केली मात्र हे लपवण्यासाठी त्याने दुसरा कांड केला. यामुळे त्याला अटक झाली असून त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील 51 वर्षीय व्यक्ती इंडोनेशियातून रविवारी मुंबई विमानतळावर आठ दिवस सुट्टी साजरी करून परतली होती. त्यानंतर संबंधित व्यक्तीची विमानतळावरील अधिकाऱ्यांनी रेग्युलर तपासणी केली. यावेळी आरोपीच्या पासपोर्टमधील काही पानं गहाळ असल्याचं तपास अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला.पोलिसांना संशय आल्याने पासपोर्टमधील पाने फाडल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानुसार संबंधित पुणेकराविरुद्ध सहारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा सहार पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता, आरोपीनं मागील वर्षी बँकॉकला चार वेळा ट्रीप केली होती. हेच पुरावे कुटुंबापासून लपवण्यासाठी त्याने थेट पासपोर्टमधील पाने फाडल्याचं लक्षात आलं. पण पासपोर्ट कायदा, १९६७ अंतर्गत जाणूनबुजून पासपोर्ट खराब करणे, त्यातील पानं फाडणं हा गुन्हा आहे. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.