दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करणाऱ्या विरोधात कायदा आणण्याची मागणी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली होती. त्यानंतर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकावरून खासदार उदयनराजे आक्रमक झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर असतानाच आता खासदार उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक दिल्लीत व्हावं अशी मोठी मागणी केली आहे. अरबी समुद्रात शिवरायांचे स्मारक व्हावं अशी मागणी त्यांनी लावून धरली.जर अरबी समुद्रात स्मारक होणे शक्य नसेल तर राज्यपाल भवनात छत्रपती शिवाजी महाराजांचे व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यपाल भवनाची 48 एकर जागा आहे. राज्यपाल महोदयांना जागा लागते किती असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. 48 एकर म्हणजे काही कमी जागा नाही. ही जागा अरबी समुद्राला लागूनच आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
या स्मारकाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली असल्याचं देखील खासदार उदयनराजे यांनी सांगितल आहे. त्याचबरोबर रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून ही आक्रमक भूमिका घेत समाधी तात्काळ हटवण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.