नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान असणाऱ्या नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची नेहमी मोठी गर्दी असते. आता या ठिकाणी भाविकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. मंदिरातील व्हीआयपी दर्शन पासेसच्या काळाबाजाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.भाविकांना सहाशे रुपयांचे देणगी दर्शन पास तब्बल दोन हजार रुपयांना विकले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात काही एजंट परराज्यातून आलेल्या भाविकांना लक्ष करून त्यांना बोगस व्हीआयपी दर्शन पास उपलब्ध करून देतात. हे पास बनावट असून एका पासकरिता दोन हजार रुपये आकारले जातात अशी माहिती समोर आली आहे. ही तिकिटे मंदिरातल्या यंत्रावर स्कॅन झाली त्यामुळे हा घोटाळा समोर आला आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी संशयित नारायण मूर्तंडक यांच्या विरोधात ठकबाजीचा गुन्हा नोंदवला आहे.
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांचे प्रतिष्ठीत श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी व्हीआयपी पासवरुन काळाबाजार होत असल्याचं समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली. सुरतचे चिराग दालिया आणि काही भाविक मार्च महिन्यात त्र्यंबकेश्वरला आले असताना त्यांची फसवणूक झाली आहे.. एका अनोळखी व्यक्तीने त्यांना दिलेल्या पासेससाठी दोन हजार रुपये घेतले मात्र ही तिकिटे मंदिरातल्या यंत्रावर स्कॅन झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला.या देवाच्या दारी भाविकांची फसवणूक होत असल्याने आता सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.