पुणे : कै . प्रकाश ( बापू ) सणस यांच्या स्मरणार्थ पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सरस्वती क्रीडा संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ७० वी खुला गट पुरूष व महिला पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे सोमवार दि. ०५ डिसेंबर ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत नातूबाग मैदान, शुक्रवार पेठ येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरस्वती क्रीडा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी दिली.
या स्पर्धेसाठी पुरूषांचे १२३ संघ व महिलांचे २५ संघ सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा प्रथम बाद / साखळी / बाद पध्दतीने होणार आहे. सदर स्पर्धेतून संभाव्य २० खेळाडूंची निवड करून त्यातून प्रशिक्षण शिबीरानंतर पुरुष व महिलांचा अंतिम १२ खेळाडूंचा पुणे जिल्ह्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे . सदर संघ अहमदनगर येथे होणा – या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
दत्तात्रय कळमकर, नीलेश लोखंडे व नाना सातव हे पुरुष गटासाठी तर शकुंतला खटावकर, राजेंद्र पायगुडे व महेंद्र धनकुडे हे निवड समितीचे सदस्य पुणे जिल्हा संघाची निवड करणार आहेत. या स्पर्धेसाठी पंचप्रमुख म्हणूं संदीप पायगुडे तर निरीक्षक म्हणून प्रकाश पवार काम पाहणार आहेत, अशी माहिती देशमुख यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन उद्या (५ डिसेंबर) सायं ६ वाजता करण्यात येणार असून स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे राजेंद्र देशमुख यांनी सांगितले.