जयपूर : आयपीएल-२०२५ सुरू होण्यासाठी आता काही दिवस शिल्लक असून सर्वच संघ आपल्या खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष देत आहेत. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आणि लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादव यांना दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. खेळाडूंच्या दुखापतीबाबत चर्चा सुरू असताना, राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड किरकोळ दुर्घटनेमुळे जखमी झाले. त्यामुळे त्यांच्या पायावर प्लास्टर चढविण्यात आले. पण असे असताना ते कुबड्या घेऊन मैदानावर आले आणि खेळाडूंना ट्रेनिंग देऊन परत गेले.
राजस्थान रॉयल्सच्या म्हणण्यानुसार, बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना दुखापत झाली आहे. राहुल द्रविड शक्य तितक्या लवकर दुरुस्त होण्याचा प्रयत्न करीत आहेत. जयपूरमध्ये येऊन संघाच्या ताफ्यात सामील होतील, अशी माहिती दिली होती. त्यानुसार द्रविडने बुधवारपासून खेळाडूंसोबत मैदानात हजेरी लावायला सुरुवात केली. राजस्थान रॉयल्सने द्रविडचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात द्रविड बग्गीतून मैदानात आले. त्यानंतर त्यांनी कुबड्यांच्या साहाय्याने मैदानात फेरफटका मारला आणि सर्व खेळाडूंना ट्रेनिंग देत संवाद साधला.
द्रविडने यशस्वी जयस्वाल, रियान परागसारख्या अनुभवी खेळाडूंना काही टिप्स दिल्या. तसेच इतर स्पोर्ट स्टाफशीही द्रविडने गप्पा मारल्या आणि संघातील वातावरण हसत खेळत ठेवले. गतवर्षीच्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने उत्कृष्ट प्रदर्शन केले होते. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता, पण अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यावेळी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात राजस्थान रॉयल्स चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे.