मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) उपाध्यक्ष व काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव शुक्ला आशियाई क्रिकेट परिषदेच्या संचालक मंडळात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर माजी कोषाध्यक्ष व भाजपचे नेते आशिष शेलार या महाद्विपीय खेळ संस्थेत कार्यकारी बोर्डाचे सदस्य असतील. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी शुक्रवारी याची घोषणा केली.
बीसीसीआयचे माजी सचिव जय शहा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष या रूपात पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे आशियाई, क्रिकेट परिषदेतील पद रिक्त झाले होते. ते या परिषदेचे अध्यक्ष होते. सैकिया यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे सांगितले की, बीसीसीआयचे पदाधिकारी व शीर्ष परिषदेकडून आम्ही त्या दोघांना त्यांचा कार्यकाळ यशस्वी व्हावा यासाठी शुभेच्छा देतो. आशियाई क्रिकेट परिषद आशियात क्रिकेटला वाढविणे व मजबूत करण्याच्या दिशेने काम करते.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सप्टेंबर २०२५ मध्ये आशिया चषक खेळला जाणार आहे. या चषकाचे यजमानपद भारताकडे आहे. मात्र, पाकिस्तानी संघ आशिया चषकासाठी भारतात येणार नाही, त्यासाठी अन्य ठिकाणाचा शोध घ्यावा लागणार आहे.