दुबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याआधी दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड यांच्यात झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यादरम्यान न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेनरीच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे आता तो न्यूझीलंड व भारत यांच्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो. स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या हेन्रीला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती. मात्र, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये दोन षटके गोलंदाजी केली होती.
सामन्यानंतर कर्णधार मिचेल सेंटनेर हेन्रीच्या उपलब्धतेवर आशावादी दिसून आला होता. मात्र, आता मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले आहे की, त्याच्या तंदुरुस्तीवर संशय कायम आहे. ते म्हणाले, माझ्या दृष्टीने आमच्यासाठी सकारात्मक बाब ही आहे की, तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी उतरला होता. त्याचे काही स्कॅन झाले आहेत व आम्ही त्याला अंतिम सामन्यात खेळण्यासाठी शक्य त्या सर्व संधी देऊ इच्छितो. मात्र, सध्या त्याची स्थिती थोडी अनिश्चित आहे. तो आपल्या खांद्यावर पडल्या कारणाने त्याला दुखापत झाली आहे. अपेक्षा आहे की, तो ठीक होईल.