India vs Australia Semi-Final: भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली आज(4 मार्च) ल दुबई येथे झालेल्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारतीय संघानं थेट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीसाठी आपली जागा निश्चित केली आहे.
आज दुबईत झालेल्या उपांत्य सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी जबरदस्त पराभव केला. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी 49 व्या षटकांतच 265 धावा करत विजयासाठीचं लक्ष्य गाठलं. या सामन्यात विराट कोहलीने महत्वपूर्ण खेळी खेळली. विराटने श्रेयस अय्यरच्या साथीनं 91 धावांची, अक्षर पटेल सोबत 44 धावांची तर राहुलच्या साथीनं 47 धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या जवळ घेऊन गेला. या सामन्यात विराट कोहलीने 84, श्रेयस अय्यरने 45, अक्षर पटेलने 27 धावांची तर राहुलने 42 धावा करून नाबाद खेळी केली.
आज दुबईच्या मैदानात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडने 33 चेंडूंमध्ये आक्रमक खेळी करत 39 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथने 96 चेंडूंमध्ये 73 धावा काढल्या. अॅलेक्स कॅरीने 57 चेंडूंमध्ये 61 धावांची आक्रमक खेळी केली. मात्र भारतीय गोलंदाजांनी वेळोवेळी विकेट्स घेऊन कांगारूंना मैदानाबाहेर पाठवले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 49.3 षटकांत 264 धवांवरच आटोपला.
भारतीय संघाचे लक्ष्य अंतिम फेरीकडे..
या सामन्यातील विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने कांगारूंना नमवून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय संघ या स्पर्धेत अपराजित राहिला आहे. आता यानंतरचा फायनल जिंकण्यावर भारताचे लक्ष्य असेल.