भोर: खेड शिवापूर (ता. भोर) गावाच्या हद्दीतील गाऊडदरा फाटा येथे सलून व्यवसाय करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घड्ली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. सुनील दिलीप सुरवसे (सध्या रा. कासुर्डी खे. बा., ता. भोर, मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. याबाबत स्वप्नील दिलीप सुरवसे यांनी राजगड पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुनील सुरवसे हा आपल्या कुटुंबासोबत कासुर्डी खेबा. (ता. भोर) येथे राहावयास होता. खेड शिवापूरजवळील गाऊडदरा फाटा येथे तो एक मेन्स पार्लर सलून चालवित होता. व्यवसायात त्याला घरी जाण्यासाठी कायम रात्रीचे १२ ते १२:३० वाजत असायचे. त्यामुळे सर्वजण लवकर झोपी जात असत. परंतु, गुरुवारी (दि. २३) तो रात्री घरी परतलाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनील याने गळफास घेतल्याचे आढळून आले.