लोणी काळभोर, ता.15 : वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडी पाट टोलनाक्याजवळ घडली असून, मंगळवारी (ता.15) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. तेजस रमेश उमाप (वय – 20, महारुद्र अपार्टमेंट, कवडी पाट टोलनाका, कदमवाकवस्ती, ता.हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तेजस हा डंपर चालक असून तो कुटुंबासोबत कवडी पाट टोलनाका परिसरात राहतो. दरम्यान, मंगळवारी तेजस हा दुपारी रूममध्ये गेला होता. रात्रीच्या नऊ वाजल्या तरी तेजसने दार उघडले नाही. म्हणून त्याच्या आईने तेजसला आवाज दिला. पण खोलीतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर तेजसाच्या आईने नागरिकांच्या साहाय्याने घराचा दरवाजा उघडला असता, तेजसने साडीच्या सहाय्याने फॅनला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी तेजसचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पुण्यात पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तेजसच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येईल. पण तेजसने आत्महत्या का केली त्यादृष्टीने पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.