काशेवाडी (पुणे): पुण्यातील काशेवाडी परिसरात २६ वर्षीय सुशील थोरात नावाच्या तरुणावर भरत उर्फ हरीश मोरे याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली होती. ही घटना 14 एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता गोल्डन ज्युबिली चौकात घडली. सुशील थोरात आणि त्याचे मित्र अनिकेत यादव आणि अभिजीत जाधव हे भीम जयंतीमध्ये गप्पा मारत उभे होते. दरम्यान, आरोपी भरत उर्फ हरीश मोरेने सुशीलच्या खिशातून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला, सुशीलला चाहूल लागल्यावर त्याने आरोपीला धक्का दिला, दरम्यान, आरोपीने याचा राग मनात धरून सुशीलवर धारदार शस्त्राने हल्ला करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने सुशीलच्या मानेवर वार करून गंभीर दुखापत केली.
मला खाली कसा काय पाडलास, आता तुला मारुनच टाकतो, असे म्हणून आरोपीने हत्यार काढून सुशील याला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुशीलवर जोराने वार करून त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान, सुशीलच्या मदतीसाठी लोक असले असता आरोपी भरत मोरे याने लोकांना हातातील हत्यार हवेत फिरवून याला कोणी वाचवायला आले तर सर्वांचे तुकडे करुन टाकेन, आपन भाई आहे, असे म्हणत धमकावले. खडक पोलिसांनी मोरेविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुशील सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहे.