शिल्पा दातार-जोशी
माहिती तंत्रज्ञानात इंजिनिअरिंग केलेली एक मुलगी लग्न झाल्यावर ‘पीजी आणि केटरिंगच्या क्षेत्राला आपलंसं करते आणि अल्पावधीतच त्यात छान यश मिळवते, तेही कोणतीही व्यवस्थापनाची पदवी नसताना! आपलं लहान बाळ सांभाळत सगळं व्यवस्थापन कुशलतेनं सांभाळणाऱ्या लोणी काळभोर येथील कदमवाक वस्तीत राहणाऱ्या राजश्री भोसले यांचं आपण म्हणूनच मनापासून कौतुक करतो.
राजश्री यांचं माहेर रांजणगाव गणपतीजवळचं! त्यांनी आयटी इंजिनिअर झाल्यावर प्रशासकीय सेवांच्या परीक्षेची तयारी सुरू केलेली होती. त्याचदरम्यान, त्यांचा विवाह होऊन त्या लोणी काळभोरला आल्या. त्यांचे यजमानही आयटी क्षेत्रातलेच. नव्या संसारात रमत असतानाच कोविड १९ आला. त्यामुळं इतरत्र जाऊन नोकरीचे प्रयत्न करण्यापेक्षा घरीच काही चांगला व्यवसाय सुरू करावा, असं त्यांना वाटलं. त्यांच्या इमारतीचं नुकतंच बांधकामही पूर्ण होत आलं होतं. तेव्हा त्यातील खोल्या जवळच असलेल्या महाविद्यालयातील परगावहून आलेल्या मुलांना राहायला देण्याचा त्यांनी विचार केला आणि २०२४ पासून अंमलबजावणीही सुरू केली.
त्यानुसार मुलांना पेईंग गेस्ट तत्त्वावर खोल्या द्यायच्या असं त्यांनी ठरवलं. या सगळ्याचं व्यवस्थापन कसं करायचं, हेही त्यांनी मनाशी पक्कं केलेलं होतं. आधी जवळच्या महाविद्यालयाच्या बाहेर एक बॅनर लावून जाहिरात केली. पण नंतर जाहिरातीची गरजच पडली नाही. कारण राहण्याचा चांगला दर्जा आणि सुरक्षित वातावरण यामुळे राहायला आलेल्या मुलांनीच जाहीरात करून सहकार्य केल्याचं त्या सांगतात.
त्या म्हणतात, ‘‘मी आता पीजीबरोबरच राजी किचन चालवते. हे पहिलंच वर्ष आहे. पण प्रतिसाद उत्तम आहे. गेले पाच महिने हे किचन चालवते आहे. त्यातून दोघींना रोजगारही दिला आहे. कारण मुलं विचारायची, जेवणाची काय सोय आहे? त्यातून एका व्यवसायातून हा दुसरा व्यवसाय उभा राहिला.’’
आता रोज २०-२५ जणांचा सकाळचा नाश्ता, दुपारचं आणि रात्रीचं जेवण तिथंच राजी किचनमधून दिलं जातं. नाश्त्याची आणि जेवणाची वेळ अजिबात चुकवली जात नाही. अनेक मुलांना बोर्नव्हिटा दूध दिलं जातं. कधी इडली-सांबार, कधी विविध भाज्यांचे पराठे, सँडविच… अगदी मुलांना आवडणारे नूडल्स, मंच्युरियन सुद्धा असतात. डब्यात फळभाज्या, पालेभाज्या, सॅलड, चटण्या, लोणची असतात. कडधान्यही मिळावीत. दह्याचे पदार्थही मिळावेत, विविध प्रकारची सत्व मिळावीत, या हेतूनं मेनूमध्ये वैविध्य असतं. ऋतुमानानुसार मेन्यू ठरवले जातात. अतिशय चांगला दर्जा राखला जातो. स्वच्छता, निर्जंतुकीकरण पाळलं जातं. विशेष म्हणजे या किचनाला सुरक्षा आणि स्वच्छतेचे मानांकन असलेले एफएसएसआय प्रमाणपत्रही मिळाले आहे.
इथं राहणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य दिलं जातं. कुणाशी जास्त बोलू नका. वेळेवर घरी या, अशा सूचनाही दिल्या जातात. सीसीटीव्ही कॅमेरेही आहेतच. आता सध्या या पीजीमध्ये तीस-एकतीस मुलं आहेत. एका खोलीत तीन-चार मुलं राहतात. शेअरिंग करतात.
रोज राजश्रीताईंचा दिनक्रम सकाळी साडेसहाला सुरू होतो. सहा वाजता गेट उघडलं की, त्या साडेसहाला त्या राजी किचनमध्ये जातात. नाश्ता-जेवणाचे पदार्थ अत्यंत काटेकोर स्वच्छतेत रांधले जातात. दुपारी अकराच्या दरम्यान त्या सगळं आवरून दुपारचा वेळ आपल्या बाळाला म्हणजेच अगस्त्यला देतात. पीजीचे नावही त्याच्या नावावरूनच ठेवल्याचे त्या आवर्जून सांगतात. इथे मुलांच्या खोल्यांमध्ये आवश्यक ते फर्निचर आहे. रोज खोली आणि त्यातील बाथरूम-स्वच्छतागृह यांची साफसफाई करायला बाई आहेत. वॉशिंग मशीन आहेत. गरम पाण्यासाठी सोलर गिझर आहे आणि हो, मुलांसाठी फ्री वायफायही आहे. खोलीत सकाळी प्रत्येकाला चहा-कॉफी करण्याची परवानगी आहे. त्या सांगतात, ‘‘अठरा एकोणीस वर्षांची मुलं आहेत. फक्त आपण आई-वडिलांपासून लांब राहत असताना आपला त्रास दुसऱ्याला व्हायला नको, एवढी काळजी त्यांनी घ्यावी, एवढीच अपेक्षा आहे.’’ इथे इमारतीचं सकाळी सहा-सातला गेट उघडतं, रात्री अकराला बंद होतं.
नाश्ता, जेवण यांची तयारी करण्यापासून ते वाढण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी राजश्रीताई स्वत: करतात. रोज चार-पाच किलोंमध्ये भाज्या लागतात. किराणा आणि भाज्या थेट किचनमध्ये येतात. किरकोळ बाबी त्या दुचाकीवरून जाऊन घेऊन येतात. संध्याकाळी पाच वाजता त्या पुन्हा किचनमध्ये जातात. रात्री साडेदहाला त्यांचा दिनक्रम पूर्ण होतो.
पती विशाल पठारे यांच्यासह, सासू आणि सासरे हे त्यांची भक्कम सपोर्ट सिस्टिम आहे. हे सगळे मुलाला सांभाळतात. घराकडेही पाहतात. आपल्या पीजी आणि राजी किचनच्या व्यवसायासाठी मनापासून आणि व्यवस्थित वेळ ज्यांच्यामुळे देता येतो, त्या सासूबाई-सासरे आणि यजमान यांच्याबद्दल त्या कृतज्ञता व्यक्त करतात.