ॲड. अश्विनी जगताप
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत महिलांचे शारीरिक आरोग्य जसे महत्त्वाचे आहे, तसेच त्यांचे मानसिक आरोग्यही अत्यंत आवश्यक आहे. स्त्रिया शरीराच्या तंदुरुस्तीसाठी योगा, झुंबा, वॉकिंग, जिम यांसारखे विविध पर्याय निवडतात. मात्र, मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असणारा मनाचा व्यायाम बहुतांश वेळा दुर्लक्षित राहतो. सततचा तणाव, जबाबदाऱ्यांचे ओझे, कुटुंब व समाजाच्या अपेक्षा यामुळे स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. संशोधनानुसार, ९०% आजार हे मनोशारीरिक असतात म्हणजेच हे मानसिक तणावामुळे उद्भवतात. त्यामुळेच मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे अनिवार्य आहे.
महिलांनी मानसिक आरोग्यासाठी कराव्यात या गोष्टी:
- जशी दृष्टी तशी सृष्टी, आयुष्याकडे, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवा. जगणं सुंदर होईल.
- स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःच्या आवडीनिवडी आणि छंद जोपासा, यामुळे मन शांत राहते.
- आपल्या भावना जवळच्या व्यक्तींशी मोकळेपणाने शेअर करा. यामुळे मनावरील ताण हलका होतो.
- निरोगी शरीरातच निरोगी मनाचे वास्तव्य असते. निरोगी शरीरासाठी पुरेशी विश्रांती,योग्य आहार नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. शरीराप्रमाणे मनही थकते, मनालाही विश्रांतीची गरज असते. ध्यानासारख्या तंत्रांनी मनाला विश्रांती मिळते.
- अति विचार ,नकारात्मक विचार, सततचा मानसिक ताणतणाव जाणवत असल्यास मनोवैज्ञानिकांचा सल्ला घ्यावा. समस्या टोकाला जाण्याआधीच तज्ज्ञांच्या मदतीने त्यातून बाहेर पडा.
स्त्री जर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम असेल तर संपूर्ण कुटुंबाचे आणि पर्यायाने समाजाचे आरोग्यही उत्तम राहते. म्हणून स्त्रियांनी स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी वेळ आणि पैसा खर्च करणे ही एक आयुष्यभरासाठीची गुंतवणूक ( लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट) समजावी.
या महिला दिनाच्या निमित्ताने, सर्व महिलांना त्यांच्या उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
(लेखिका या मानसशास्त्रीय समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत)