पुणे: लग्न झाल्यापासून पती, सासू-सासरे यांनी संगनमत करून 28 वर्षीय सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला दीड वर्षांच्या बाळासह घराबाहेर काढल्याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पती आकाश नारायण गव्हाणे, नीता नारायण गव्हाणे, नारायण हरिभाऊ गव्हाणे (सर्व राहणार जीवनधारा सोसायटी, मोशी), प्रियंका मुरकुटे, स्वप्निल मुरकुटे, सुरज लांडगे, सायली तांगुदे, डॉ. संभाजी बहिरट, डॉ. चिनार बहिरट यांच्यावर भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 377, 498 A, 354 A, 379, 324, 323, 504, 506, 34 व माहिती तंत्रज्ञान आणि अधिनियम 66 (E) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियमन 2013 3(1) आणि 3(2) हुंडाबंदी अधिनियम 1961 चे 3 व 4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आहे
मिळालेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी लग्नामध्ये दागिने व उर्वरित पाच लाख रुपये दिले नाहीत म्हणून विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने तिच्या इच्छेविरुद्ध मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ दाखवून तसेच अनैसर्गिक शारीरिक संबंध निर्माण करत संमतीविना आक्षेपार्ह फोटो काढले. फिर्यादी गर्भवती असताना पतीच्या मामी डॉ. चिनार बहिरट यांनी मोशीमधील अनामय हॉस्पिटल येथे तपासणी करून गर्भाची वाढ होत नसल्याचे कारण देत गर्भपात केला. फिर्यादी यांना दुसऱ्या वेळी मुलगाच व्हावा, यासाठी सासूने मृत्यूची भीती दाखवत मंतरलेली राख प्रसाद म्हणून तब्बल चार महिने दर अमावस्येवेळी खाऊ घातली. करणी, भूतबाधा, जादूटोणा यासारखी अघोरी कृत्ये करत त्रास दिला.
दुसऱ्या गरोदरपणावेळी डॉ. बहिरट मामा आणि मामी यांनी त्यांच्या आळंदी येथिल बहिरट नर्सिंग होम येथे गर्भलिंग निदान केले. पतीचे विवाहबाह्य संबंध समजल्यामुळे त्याबाबत विचारणा केल्यावर गरोदर असतानाच शिवीगाळ करत पोटावर लाथांनी मारले. वारंवार विवाहबाह्य संबंधांना विरोध केल्यामुळे पतीने विवाहितेला घरातील गॅलरीत केस धरून ओढत नेत खाली ढकलून देईल व तू स्वत:च आत्महत्या केल्याचे सर्वांना सांगेन, अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मी आमदार, खासदारांसोबत उठतो बसतो, पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे, धमकावत तिला तिला घराबाहेर काढले आणि घटस्फोट घेण्यासाठी तगादा लावला. पोलीस अधिक तपास करत आहेत.