उरुळी कांचन, (पुणे) : पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालय, उरुळी कांचन येथे ‘आम्ही मणिरत्न’ माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून जुन्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी बोऱ्हाडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश गायकवाड, माजी विद्यार्थी समिती समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर, कला विभागप्रमुख प्रा. डॉ. समीर आबनावे, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. सुजाता गायकवाड, संगणक शास्त्र विभागप्रमुख प्रा. वैशाली चौधरी, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य सचिन थोरात आदी उपस्थित होते. यावेळी दिवंगत प्रा. विजय कानकाटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करत महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्यांनी माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत संस्थेच्या विकासात त्यांच्या योगदानाचे महत्त्व सांगितले.
या मेळाव्यात अनेक यशस्वी माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव व्यक्त करत नव्या पिढीला मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या उद्योग, प्रशासकीय सेवा, पत्रकारिता, संशोधन व सामाजिक कार्यातील योगदानाबाबत माहिती दिली. यामध्ये विशाल कांबळे, लिंबाजी आगलावे, स्वप्नाली तांबे, योगेश जगताप, सुनंदा म्हस्के, सारिका जगताप – कांचन, संदीप मेमाणे, काळूराम कुरकुंडे, दीपिका कुंभार, अतुल कोठारी, प्राची म्हेत्रे, रोहिणी कांचन – कोतवाल, सचिन थोरात, आदी माजी विद्यार्थ्यांनी आपली अनुभव रुपी मनोगते व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध कायम ठेवण्याच्या संकल्पाने वातावरण भारावून गेले.
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष शैलेश गायकवाड यांनी आपल्या भाषणात महाविद्यालयाच्या वाढत्या यशाचा उल्लेख केला आणि माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले. समन्वयक प्रा. अनुप्रिता भोर यांनीही माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, कार्यक्रमाच्या प्रारंभी दिवंगत प्रा. विजय कानकाटे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.आभार प्रा. शुभांगी रानवडे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. अनुजा झाटे यांनी केले. या स्नेहमेळाव्यासाठी 277 माजी विद्यार्थी उपस्थित होते. स्नेहभोजनाने माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याची सांगता झाली.