दिल्ली: दिल्ली येथील कॉमनवेल्थ सिटी या मैदानावर चौथ्या खेलो मास्टर्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत उरुळी कांचन येथील धनंजय मदने यांनी 2 पदकास गवसणी घातली. क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही असेच आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे.
दिल्ली येथे खेलो मास्टर्स गेम्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2025 कॉमनवेल्थ सिटी मैदानावर जोशपूर्ण वातावरणात पार पडल्या. खेलो मास्टर्स गेम्स राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे दि.11 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान दिल्ली येथे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि पुणे येथील इनोसन्ट टाईम्स स्कूलचे क्रीडा शिक्षक धनंजय लक्ष्मण मदने यांनी सहभाग घेतला.
दिल्ली येथील कॉमनवेल्थ सिटी या मैदानावर सदर स्पर्धेत देशभरातून अठरा राज्यांनी सहभाग नोंदविला असून महाराष्ट्र राज्याच्या एकूण 120 खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 110 मीटर अडथळा शर्यत, 400 मीटर अडथळा शर्यत, गोळा फेक, भालाफेक, थाळी फेक, लांब उडी, उंच उडी, तेहेरी उडी, या क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला होता. सदर स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने उत्तुंग भरारी घेत देशात चांगले नावलौकिक केले असून त्यामध्ये 100 मीटर धावणे 200 मीटर धावणे 400 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात विविध पदकांची मेजवानी महाराष्ट्राला दिली आहे.
धनंजय मदने यांनी 110 मीटर हार्डल्स् स्पर्धा-रौप्यपदक, 400 मीटर हार्डल्स् स्पर्धा – रौप्य पदक अशी चमकदार कामगिरी दाखवत एकूण दोन पदके पटकावली आहेत. धनंजय मदने यांनी अत्यंत खडतर प्रवास करत आजपर्यंत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय असे अनेकविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन असंख्य पदकं महाराष्ट्राला मिळवून दिली आहेत. साधी राहणी उच्च विचार. असे राहणीमान असणाऱ्या धनंजय मदने यांना सदर यशानंतर इनोसन्ट टाईम्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष डॉ.अंकिता संघवी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.