उरुळी कांचन, (पुणे) : पुणे – सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) फाट्यावरील इलेक्ट्रीकल्स दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील मोटार वायडींग, व इतर साहित्य असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (ता. 21) संध्याकळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
याप्रकरणी दत्ता लहु ढवळे (वय 35, व्यावसाय मोटार वायडींग, रा. सोरतापवाडी, खटाटेवस्ती ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता ढवळे यांचे सोरतापवाडी फाट्यावर शिवराज इलेक्ट्रीकल्स नावाचे मोटार वायडींगचे दुकान आहे. शुक्रवारी संध्याकाळी चुलत भाऊ संभाजी ढवळे (रा. केशवनगर, मांजरी ता. हवेली) हे दुकान बंद करून घरी निघुन गेले होते. शनिवारी (ता. 22) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले होते.
यावेळी दुकानाचे शटर एका बाजुने कशानेतरी कापुन दुकान उघडे असल्याचे दिसून आले. आत जाऊन पाहणी केली असता दुकानात विक्रीसाठी ठेवलेले साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच दुकानातील मोटार वायडींग तार, सबमसींबल वायर, इन्यामल वायर असा 68 हजार रुपयांचा मुद्देमाल दिसून आला नाही. यावरून दुकानात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, पत्नी आजारी असल्याने असल्याने तक्रार उशिरा देण्यात आली. दत्ता ढवळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.