पिंपरी : शासकीय व बँक सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बांधकाम साईट विकसित करीत असल्याचे सांगत दोघांची चार लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी बुधवारी (दि. १५) हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कस्पटे वस्ती, वाकड येथे राहणाऱ्या ३९ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर कांतीलाल भुमकर (वय ४१, रा. भूमकर चौक, वाकड) आणि गौरव सचदेवा (पत्ता माहिती नाही) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २०१९ ते जून २०२४ या कालावधीत मुंबई-बंगळुरू महामार्गाच्या बाजूला, फोक्सवॅगन शोरूमच्या बाजूला, वाकड येथे घडली. आरोपींनी आपसात संगनमत करून केंद्रीयसदन या ऑनलाइन वेबसाईटवर केंद्रीय कर्मचारी व बँक सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांसाठी वाकड परिसरात बांधकाम साईट विकसित करीत असल्याची जाहिरात केली. मात्र, कोणतीही साईट विकसित न करता फिर्यादी यांची दोन लाख ५५ हजार व त्यांच्या ओळखीच्या महिलेची दोन लाख रुपये असे एकूण चार लाख ५५ हजारांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.