पुणे: पुणे शहरात आयटी इंजिनिअरला मारहाण करुन खुनाचा प्रयत्न करणार्या कुख्यात गुंड गजा मारणे याच्याकडील दोन फॉर्च्युनर गाड्या गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि. २८) रात्री जप्त केल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आता दोन दुचाकीसह दोन कार अशी एकूण चार वाहने जप्त करण्यात आली आहेत.
कोथरुडमधील भेलकेनगर चौकात शिवजयंतीच्या दिवशी आपल्या दुचाकीवरुन जाणार्या देवेंद्र जोग यांना गजा मारणे टोळीतील तिघांनी मारहाण केली होती. मारहाण करणार्या चौघांपैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यावेळी तपासात हे सराईत गुंड असून ते गजा मारणे टोळीतील असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन कुख्यात गुंड गजा मारणे याला अटक केली. न्यायालयाने मारणे याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजा मारणेच्या टोळीने जोग यांना मारहाण केली होती. त्यावेळचे फुटेजची तपासणी करण्यात आली असून परिसरातील दुकानदार, टपरीचालक अशा अनेकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यांच्या साक्षी देखील नोंदविण्यात आल्या आहेत. त्यावेळी गजा मारणे याच्या दोन फॉर्च्युनर गाड्या येथे असल्याने पोलिसांनी या गाड्या जप्त केल्या आहेत. आणखी काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले असून त्याच्या तपासणीतून यामध्ये आणखी कोण कोण लोक होते, याचा तपास केला जात आहे.
जोग यांना मारहाण करणार्या तिघांना कोथरुड पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा साथीदार बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार याचा शोध अद्याप लागला नसून तो अजूनही फरार आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच रुपेश मारणे याचाही शोध घेतला जात आहे.