पिंपरी : शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीवर पिंपरी पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये दोन बांगलादेशींना अटक केली आहे. त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड, पासपोर्ट, जन्म दाखला व शाळा सोडल्याचा दाखला मिळून आला. ही कारवाई चिंचवड येथील भोला हॉटेलच्या मागे करण्यात आली. शोहग सुकुमार मजुमदार (वय २०) व सुमन गोपाळ टिकादार (वय ३५) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस अमलदार मोहसीन रमजान शेख यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरात पिंपरी येथे काही बांग्लादेशी घुसखोर ओळख लपवून वास्तव्य करत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दहशतवाद विरोधी शाखेला मिळाली. दहशतवाद विरोधी शाखा आणि पिंपरी पोलिसांनी कारवाई करत संशयितांना अटक केली. त्यांनी बनावट कागदपत्राच्या आधारे तसेच भारतामध्ये राहण्यासाठी लागणाऱ्या वैध व्हिसाशिवाय भारत बांग्लादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परावनगीशिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.