चाकण : जेवणानंतर घराजवळ शतपावली करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावून दुचाकीवरून पोबारा केलेल्या एका चोरट्यासह दोन विधीसंघर्षीत बालकांना महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीसांनी जेरबंद केल्याची माहिती महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.
वासुली (ता. खेड) येथील अर्चना दीपक लिंभोरे या बुधवारी (दि.२ एप्रिल) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून घराजवळ शतपावली करत होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी अर्चना यांच्या गळ्यातील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून चोरून नेले. त्याच दिवशी लागोपाठ ३ चैन स्नॅचिंगच्या घटना समोर आल्या होत्या.
या घटनांच्या अनुषंगाने वासुली ते कामशेत असे ४५ किमी अंतराच्या अंतर्गत रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून मोटार सायकलवरील तीन जणांच्या संशयास्पद हालचाली यांची माहिती घेऊन एका संशयितासह दोन विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरी केलेले ३ लाख, ५७ हजार रुपये किमतीचे ५ तोळे, ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त केली आहे. चोरीसाठी मोटार सायकलही चाकण येथून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.