पळसदेव (वार्ताहार – संतोष पवार)
पळसदेव ता.16: इंदापूर येथील श्री पळसनाथ यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या लाल मातीतील कुस्ती आखाड्यात प्रथम क्रमाकांच्या बक्षिसासाठी उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड विरुध्द उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांच्यातील लढत बरोबरीत सोडविण्यात आली. तर दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी झालेल्या लढतीत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रवि चव्हाण याने हरियाणाच्या रोहित याला आस्मान दाखविले. साकेत यादव विरुध्द प्रशांत जगताप यांच्या लढतीत जगताप विजयी झाला. तर मनीष रायते विरुध्द सतपाल सोनटक्के यांच्या लढतीत सोनटक्के वरचढ ठरला. या झालेल्या अटीतटीच्या लढतीमुळे पाहणाऱ्या कुस्ती शौकिनांचे डोळ्याचे पारणे फिटले.
पळसदेव (ता. इंदापूर) येथील ग्रामदैवत पळसनाथ यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात लहान-मोठ्या सुमारे २०० कुस्त्या पार पडल्या.
महाराष्ट्राच्या तांबड्या मातीशी इमान ठेवून वर्षभर मेहनत करून गाव यात्रेतील आखाड्यावर कुस्त्यांसाठी येणाऱ्या पैलवानांची कदर करून त्यांना भरघोस रकमेचे इनाम देऊन त्यांचा मानसन्मान करणारे पळसदेवगाव हे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यावेळी नामवंत मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी परिसरातील कुस्तीशौकीनांनी मोठी गर्दी केली होती.
यात्रेनिमित्त पळसनाथ मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची आरास करुन सजावट करण्यात आली होती.
शुक्रवारी (ता. ११) सकाळी देवाची महापूजा, आरती व अभिषेक करण्यात आला. सायंकाळी देवाच्या पालखीची वाजत-गाजत छबीना मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी, लेझीमाचा डाव व तोफांच्या सलामीत ही छबिना मिरवणूक पहाटेपर्यंत सुरु होती. गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर पालखी येताच देवाची पूजा केली जात होती.
शनिवारी यात्रा बाजार भरला होता. यामध्ये महिलांनी खरेदीचा मनमुराद आनंद लुटला. तर सायंकाळी येथील आखाड्यात भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानात लहान-मोठ्या सुमारे दोनशे कुस्त्या पार पडल्या.
पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसापासून ते दहाव्या क्रमांकाच्या बक्षिसापर्यंत नेमलेल्या कुस्त्यांनी उपस्थित कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे, डी.एन.जगताप, रावसाहेब मगर, गोविंद पवार आदींसह मान्यवरांनी कुस्ती आखाड्यास भेट देत कुस्त्या पाहण्याचा आनंद लुटला. तर प्रशांत भागवत, युवराज केचे, सुभाष दिवसे यांनी कुस्त्यांचे समालोचन केले. आखाड्याचे सूत्रसंचालन तानाजी काळे व मेघराज कुचेकर पाटील यांनी केले.