वडोदरा, ता. 14: गुजरातमधील वडोदऱ्यात करेलीबाग परिसरात एका मद्यधुंद कारचालकाने जीवघेणा तांडव घालून एकाचा बळी घेतला, तर अनेकांना गंभीर जखमी केले. गुरुवारी रात्री झालेल्या या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, आरोपीच्या संतापजनक वर्तनामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.
हा थरारक अपघात वडोदऱ्यातील अमरापाली चार रस्त्याजवळ घडला. प्रत्यक्षदर्शी व सीसीटीव्ही फुटेजनुसार, काळ्या रंगाच्या भरधाव कारचा चालकाने नियंत्रण सुटल्याने एका दुचाकीला धडक दिली. यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या अनेक निष्पाप नागरिकांना जोरदार धक्के बसले. या अपघातात ४८ वर्षीय हेमालीबेन पटेल यांचा जागीच मृत्यू झाला, तर १२ वर्षांची जानी, ३५ वर्षांची निशाबेन, १० वर्षीय एक मुलगी आणि ४० वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर काही क्षणांतच घटनास्थळी पोलिस आणि नागरिकांची गर्दी जमली. मात्र, त्याहून धक्कादायक म्हणजे, कारच्या समोरासमोर मृत्यू दिसत असतानाही मद्यधुंद आरोपी गाडीच्या बाहेर उतरला आणि अजबच वागू लागला. तो नशेत लटपटत ओरडत होता – “आणखी एक राउंड, आणखी एक राउंड!” आणि “ओम नमः शिवाय!”
येथे पाहा व्हायरल व्हिडीओ:
निष्पापांचा बळी घेतल्यानंतरही हा मद्यधुंद माणूस उद्धटपणे वागत होता. यामुळे नागरिक संतापले आणि परिसरात तणाव निर्माण झाला. स्थानिकांनी पोलिसांना तत्काळ बोलावले.
संयुक्त पोलिस आयुक्त लीना पाटील यांनी माध्यमांना सांगितले की, आरोपी दारूच्या नशेत होता आणि त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
“ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. एक चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली, ज्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे. हा स्पष्टपणे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्याचा प्रकार आहे,” असे त्यांनी सांगितले.
पोलिस आता आरोपीच्या रक्ताच्या तपासणीसाठी पुढील प्रक्रिया करत आहेत. त्याने केवळ दारू प्यायली होती की त्याने इतर अमली पदार्थही सेवन केले होते, याचा शोध घेतला जात आहे.
या प्रकारामुळे वडोदऱ्यात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी मद्यधुंद वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी लोकांची भावना आहे.