पुणे: शहरातील स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल पुणे पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांकडून त्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये आरोपी गाडे आणि पीडित तरूणीमध्ये यापूर्वी कोणतेही संभाषण झाले नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान, प्रकरणी आरोपी दत्ता गाडे १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. सध्या दत्ता गाडे याची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. आता त्याच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. त्यामधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्यानंतर नराधम दत्ता गाडे याने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. पुणे पोलिसांनी शिवशाही बस फॉरेन्सिक लॅब पाठवली असून, गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये २५ फेब्रुवारी रोजी दत्ता गाडे याने फलटणला जाणाऱ्या तरूणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार केला, त्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिली. हे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली.