पुणे : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. फरार असणाऱ्या आरोपी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. पोलीस कोठडीत नेल्यानंतर दत्ता गाडेनं माझं चुकलं, मला माफ करा, टाफो फोडत त्याने आपली चुक मान्य केली आहे, तसेच त्याने एक मोठा दावाही केला आहे.
मी अत्याचार केला नाही, सहमतीनं संबंध झाले..
आरोपीला पुणे पोलिसांनी कोठडीत नेल्यानंतर गाडेनं चुक कबूल केली. ‘माझं चुकलं, मी पापी आहे’ असं म्हणत दत्ता गाडेनं एकच टाहो फोडला आहे. त्यासोबत त्याने एक धक्कादायक दावा देखील केला आहे. ‘मी अत्याचार केला नाही, सहमतीनं संबंध झाले आहेत’. असा दावा गाडेकडून पोलिसांसमोर करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत आहेत.
आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘मध्य रात्री १ वाजता स्वारगेट प्रकरणातील आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गुन्हे शाखेचे पथक, स्वारगेट पोलिसांचे पथक यासह ५०० पोलिस अधिकारी कर्मचारी गेल्या ३ दिवसांपासून गुनाट गावात होते. ४०० ते ५०० ग्रामस्थांच्या वतीनं चांगला पाठिंबा मिळाला. श्वान पथकानं सुद्धा उत्तम कामगिरी केली. ड्रोनमुळे आरोपीचा मार्ग कळला’. असे त्यांनी सांगितले.