पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी डेपोमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी दत्ता गाडेचा पोलिस कसून शोध घेत आहेत. गाडेला शोधून काढण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने १३ पथके तयार केली आहेत. पुणे पोलिसांकडून दत्ता गाडेला शोधण्यासाठी वेगाने प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांकडून शिरूरमध्ये ड्रोन इमेजिंग सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेलेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता ऊसाच्या शेतात लपून बसल्याची शंका आहे.
दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडे आणि त्याचा सख्खा भाऊ हे दिसायला सारखेच आहेत. घटना घडल्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून गाडेचा फोन बंद आहे. गाडेवर यापूर्वी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे २ गुन्हे, तर शिरूर, कोतवाली, सुपा आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. घटना घडल्यानंतर आरोपीने थेट त्याचे गाव गाठले होते. घरामध्ये पाच तास थांबल्यानंतर, तो त्या ठिकाणावरून फरार झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
शिरूर तालुक्यातील गुणाट गावात आरोपी दत्तात्रय गाडे याचा ड्रोन कॅमेऱ्याद्वारे पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांना गाडे हा ऊसामध्ये लपून बसल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली आहे. त्यानंतर पुणे शहर पोलिसांकडून ड्रोनद्वारे ऊस शेतीमध्ये गाडेचा शोध सुरू आहे. शेतात असलेल्या घरात आरोपी हा पाणी पिण्यासाठी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पोलिसांचे पथक शिरूरमध्येच त्याचा शोध घेत आहे.