यवत (पुणे): ग्रामीण भागात सध्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत असून हजारो रुपये वार्षिक फी भरून अनेकांची मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जाऊ लागली आहेत, तर दुसरीकडे अजूनही शिक्षण प्रवाहापासून वंचित असणारी खूप मुले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुनीता काटम या गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षणाचे धडे देताना आपल्या आजूबाजूला असलेल्या सामाजिक प्रश्नांमधील समस्या दूर करण्यासाठी कार्यरत आहेत.
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार दरवर्षी येत असतात. ऊसतोडणीसाठी बीड, नगर, नांदेड आदी जिल्ह्यांतून अनेक ऊसतोड कामगार दौंड तालुक्यात स्थलांतरित होत असल्याने ऊसतोडणी मजुरांच्या मुलांचे शिक्षणाचे मात्र हाल होतात, कुटुंबासह स्थलांतरित झाल्यामुळे कारखान्यावर राहणाऱ्या लहान मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. अशा ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षण देण्याचा ध्यास घेतलेल्या शिक्षिका म्हणजे यवत येथील रहिवाशी व वडगाव बांडे प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सुनीता काटम यांची ओळख आहे.
साखरशाळा बंद दौंड तालुक्यात ऊसतोडणीसाठी येणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची शेकडो मुले प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतात. अशा लहान मुलांना शिक्षण मिळावे यासाठी सुनीता काटम यांनी विशेष प्रयत्न करून पुण्यातील डोअर स्टेप संस्थेच्या मदतीने ऑनलाईन शिक्षण सुरू केले. सामाजिक कार्यात मदत करणाऱ्या संस्थांच्या सहकार्याने अनुराज शुगर्स येथील १५० तर श्रीनाथ म्हास्कोबा कारखाना (पाटेठाण) येथील २०० विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला. गावातील दोन सुशिक्षित महिलांच्या मदतीने मुलाना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
महिलांच्या मासिक पाळीबद्दल आजही समाजात न्यूनगंड पाळला जातो. कोविडकाळात दीड वर्षापासून सर्व शाळा -महाविद्यालये बंद असल्याने मासिक पाळी आणि सॅनिटरी नॅपकीनच्या बाबत सुनीता काटम व त्यांची मुलगी साक्षी यांनी सुमारे २० हजार मुली व महिलांना प्रशिक्षण दिले. नंतरही या विषयावर प्रशिक्षण आणि कार्य सुरूच ठेवले. त्यांच्या या कार्याचा श. ल. चव्हाण प्रतिष्ठान, पुणे यांच्यामार्फत गौरव करण्यात आला आहे. नुकतेच त्यांना सुमतीबाई गोरे ट्रस्ट पुणे यांच्यावतीने प्रसिद्ध साहित्यिक व ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
त्या लेखिका आणि कवयित्रीही आहेत. मी नदीचा कोण (कवितासंग्रह), संपादन ‘मशागत कोवळ्या मनाची (विद्यार्थीलिखित कवितासंग्रह) ‘बालकांचे हक्क व कायदे’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सध्या त्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे येथे विषय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कामात पती विजय काटम, मुलगी साक्षी काटम व मुलगा अनुराग काटम यांसह विविध संस्था व त्यांचे सहकारी त्यांना मोलाचे सहकार्य करतात.