युनूस तांबोळी
ही संघर्षाची गोष्ट आहे घोडनदीच्या किनारी असलेल्या चांडोह, ता. शिरूर या गावच्या शेतकरी मंगल अशोक भाकरे यांची. पती आणि सासू-सासऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी शेतात काबाडकष्ट करून त्यांनी लीलया सांभाळल्याने आज सुखाचे दिवस आले आणि कष्ट मंगलमय झाले आहेत.
चांडोह हे कमी लोकसंख्येचे गाव आहे. दुसऱ्या गावाला जायचे असले तरी या ठिकाणी एसटी आजतागायत येत नाही. त्यामुळे बाहेरगावी जाण्यासाठी पायपीट करणं आलंच. मंगलताईंनी आयुष्यभर अशी पायपीट केली आणि शेती आणि संसारही समृद्ध केला. पती-पत्नी, तीन मुलं, सासू सासरे असा त्यांचा भरल्या घराचा संसार होता. पती अशोक भाकरे गावचे पोलिस पाटील होते. पण २००४ साली अचानक त्यांचे निधन झाले. परिणामी सासरे दगडू, सासू विठाबाई आणी मुलगा सुदर्शन, मुलगी भाग्यश्री विजश्री आणि जयश्री असा मोठा परिवार सांभाळण्याची जबाबदारी मंगलताईंवर पडली.
त्यांच्याकडे अवघी साडेसहा एकर शेतजमीन आहे. शेती नदीजवळ असली तरी पाणी आणण्याची सोय नव्हती. पण तरीही मुलांच्या मदतीने कसेबशी शेती फुलविण्याचे काम त्यांनी सुरू केले. आळीपाळीने शेतजमिनीत वेगवेगळी पिके घेण्यास सुरवात केली. जोडीला गावरान गाय अन् शेळी सांभाळायला लागल्या. वेळप्रसंगी इत्तरांच्या शेतीवर मजूरी करायलाही मागे पुढं पाहिलं नाही. परिणामी शेती आणि संसार पुन्हा हिरवागार होऊ लागला. पण नियतीला हेही सुख मान्य नसावं. २०१६ मध्ये सासू-सासऱ्यांचे निधन झाले आणि घरचा ज्येष्ठांचा आधार गेला. पण त्यांनी हे दु:ख पचवत शेती सुरू ठेवली. दरम्यान मुलगा सुदर्शनही हळूहळू शेतीची कामे करू लागला होता. त्यातून दोघी मुलींची लग्नं आणि नंतर मुलाचेही लग्न झाले. पण पुन्हा एक धक्का त्यांना बसलाच. तो म्हणजे प्रसुतीदरम्यान मुलगी जयश्रीचे निधन झाले. आता हे तिसरे दु:ख त्यांच्यावर कोसळले, पण त्या डगमगणाऱ्या नव्हत्याच. पुन्हा सावरल्या, उभ्या राहिल्या आणि नेकीने शेती करू लागल्या.
आज ऊस, कांदा, मका, बाजरी, गहू, भुईमूग असा विविध प्रकारची पिके ते शेतात हंगामानुसार घेतात. घरची भाजी ही सेंद्रिय पद्धतीने घेण्याचा त्यांचा कल असतो. त्यामुळे दोन गुंठ्यात पालेभाज्या करत असतात. याशिवाय संकरीत गाय घेऊन दुग्धव्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. त्या बरोबर गावरान कोंबड्या संभाळण्याचे काम केले जात आहे. शेळी पालन आहेच जोडीला. यातून त्यांचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरळीत चाललाय. मध्यंतरी मुलाचे लग्न होऊन सुनबाई भक्ती त्यांच्या कुटुंबात आल्यात. त्याही शेतीत कष्ट करून कुटुंबाला हातभार लावतात. सन २०१८ मध्ये सुदर्शन पोलिस पाटील पदासाठी निवडला गेला. तो देखील गावातील विविध कामांसाठी पुढाकार घेत असून गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस खात्याला मदत करताना दिसतो. मुलगा साई आणि मुलगी छकूली अशी नातवांची लुडबूड घरात असते. मंगलताईंची हरवलेली माणसं सुना-नातवंडांच्या रुपात आता त्यांना पुन्हा मिळाली आहेत. कष्टाचे खऱ्या अर्थाने मंगल फळ मिळाले आहे.