पुणे: फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक कर्करोग विरोधी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. तसेच कॅन्सर हा आजार अनुवंशिकता तसेच तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होतो. ९० टक्के लोकांना अनुवंशिकतेने तर १० टक्के लोकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने कॅन्सर होतो. कॅन्सरचे अनेक प्रकार असले तरी पुरुषांमध्ये प्रामुख्याने तोंडाचा, फुप्फुसाचा, यकृत, अन्ननलिकेचा कॅन्सर होतो. गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी याच्या सेवन केल्याने कॅन्सर होतो. त्यात आता ग्रामीण भागात या कॅन्सर आजाराचा विळखा वाढत चालला असल्या कारणाने धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी केडगाव च्या विद्यार्थ्यानी कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन केले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी कर्करोगाचे प्रकार, लक्षणे, टाळण्याचे मार्ग आणि उपचार पद्धती याविषयी प्रभावी संदेश दिले आहेत.
पथनाट्यात धूम्रपान, मद्यपान, अस्वच्छ आहार आणि बैठ्या जीवनशैलीमुळे कर्करोग होण्याची शक्यता वाढते यावर प्रकाश टाकण्यात आला. याशिवाय, वेळेत निदान झाल्यास कर्करोगावर यशस्वी उपचार कसे करता येतात याची माहितीही देण्यात आली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष वाघमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “विद्यार्थ्यांनी समाजासाठी जबाबदारी घेत कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत जागरूकता निर्माण केली आहे, हे प्रशंसनीय आहे.”
हा उपक्रम केडगाव शहरातील मुख्य चौकात आयोजित करण्यात आला होता, जिथे नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.विकास गडधे व इतर प्राध्यापक उपस्थीत होते.