शिक्रापूर : खुनाची तक्रार मागे घ्यावी, यासाठी दोघांना मारहाण करीत घरावर दगडफेक केली. ही घटना निमगाव दुडे (ता. शिरुर) येथे घडली. याबाबत रवींद्र छगन रणसिंग (वय ३२ रा. निमगाव दुडे ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी बाबू प्रभाकर वाळुंज, सोनू बाबा पटेल यासह बाबूचा चुलत भाऊ (सर्व रा. टाकळी हाजी ता. शिरुर जि. पुणे) यासह तीन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र रणसिंग यांनी काही दिवसांपूर्वी नितीन गावडे यांच्या विरोधात खुनाची तक्रार दाखल केली होती. सदर तक्रार मागे घेण्यासाठी नितीनचे काही नातेवाईक व मित्र वारंवार प्रयत्न करत आहेत. तर रवींद्र रणसिंग यांचे आतेभाऊ राजू थोरात हे टाकळी हाजी पेट्रोल पंप समोरून येत असताना नितीन गावडेचे मित्र बाबू वाळुंजसह त्याच्या साथीदारांनी राजू याला अडवून, ‘तू रवींद्र रणसिंगला नितीन गावडेची केस मागे घ्यायला सांग’ असे म्हणून मारहाण केली.
त्यांनतर रात्रीच्या सुमारास बाबू वाळुंजसह आदी व्यक्तींनी रवींद्र रणसिंग यांच्या घरावर दगडफेक केली. त्यावेळी घरात घुसून रवींद्र यांना शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण केली. तसेच ‘तू नितीनची केस मागे घेणार आहे का नाही? असे म्हणून धमकी दिली. परत जात असताना बाबूच्या चुलत भावाने रवींद्र रणसिंग यांच्या पत्नीच्या गळ्यातील गंठण हिसकावून ओढून नेले. पुढील तपास पोलीस हवालदार भागवत गरकळ हे करत आहेत.