पुणे : राज्याच्या वेगवेगळ्या शहरातून बेपत्ता झालेली मुले आणि महिलांच्या शोधासाठी पोलिसांकडून ‘ऑपरेशम मुस्कान – 13’ ही विशेष मोहीम 1 ते 30 डिसेंबर या कालावधीत राबविली जाणार आहे. याचदरम्यान पुणे शहरातून हरविलेल्या बेपत्ता बालके (18 वर्षाखालील व महिलांचा 18 वर्षावरील) शोध घेण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
ऑपरेशन मुस्कान ही हरवलेल्या मुलांना शोधून त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यासाठी राबवली जाणारी एक मोहीम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही मोहीम राबवली जाते. त्यानुसार यंदा 1 ते 30 डिसेंबर दरम्यान ‘ऑपरेशन मुस्कान 13’ राज्यात राबविली जाणार आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने पुणे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखा, तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकाची स्थापना करण्यात येणार आहे. ही टीम पुणे शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना भेट देऊन पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना समक्ष भेटून संबंधित मोहिमेबाबत माहिती देणार आहेत.
पुणे शहरातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. एरवी शहरातून बेपत्ता झालेली लहान मुले, महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येतात. बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी 24 तास आणि 365 दिवस प्राधान्य देण्यात आले आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.