सासवड (पुणे): राज्य शासनाने क्षेत्रीय स्तरावरील कार्यालयासाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित केला असून, त्यामध्ये 7 कलमी कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यामधील सुखद जीवनमान हा एक भाग असून, त्या अंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा जास्त सुलभ करण्याच्या दृष्टीने तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या कल्पनेतून व जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यात तलाठी स्तरावर कार्यालयीन गतिमानता अभियान राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर अभियानाअंतर्गत नागरिकांना वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती योजना, पाणंद रस्ते खुले करणे, विविध दाखले वाटप, नव मतदार नोंदणी, शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करणे, राशन कार्ड इत्यादी सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी तालुक्यांमध्ये सेवा व लाभार्थी यादी वारस नोंद -122, लक्ष्मी मुक्ती योजना- 25, पाणंद रस्ते व नकाशावरील रस्ते -70, संगोयो योजना- 34, विविध प्रकारचे दाखले- 291, प्रलंबित फेरफार निर्गती व निकाल-58, ऍग्रो स्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांना ओळखपत्र -6879, मतदार नोंदणी -40, राशन कार्ड- 14, असे एकूण 1318 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सदर अभियान यशस्वी राबवण्यासाठी तहसीलदार राजपूत यांच्या संदीप पाटील निवासी नायब तहसीलदार, सोनाली वाघ महसूल नायक तहसीलदार, शुभांगी गोंजारी निवडणूक नायब तहसीलदार, महादेव जाधव संगोयो नायब तहसीलदार तसेच मंडल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रयत्न केले आहेत.
पुरंदर मधील नागरिकांना मिळणाऱ्या सेवा ही मुदतीत व जलद गतीने देण्यात येणार असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, तसेच नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी प्रशासनाशी संपर्क करावा, असे आवाहन विक्रम राजपूत तहसीलदार पुरंदर यांनी सर्वसामान्य नागरिकांना पुरंदर मध्ये केले आहे.