सागर घरत
करमाळा(पुणे) : नारायण पाटील यांनी दिनांक 23 डिसेंब 2024 रोजी मध्य रेल्वे, सोलापूर मंडल यांना एका लेखी पत्राद्वारे जेऊर रेल्वे स्थानकावर गाडी क्रमांक 09627-09628 सोलापूर अजमेर एक्स्प्रेस या साप्ताहिक रेल्वे गाडीस थांबा मिळावा अशी मागणी केली होती. या मागणीचा मध्य रेल्वे सोलापूर मंडल यांनी विचार करून सकारात्मक अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे.
याबाबतची माहिती मध्य रेल्वे सोलापूर मंडलचे वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक योगेश पाटील यांनी आमदार नारायण पाटील यांना एका लेखी पत्राद्वारे कळवली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या मागणीनुसार जेऊर रेल्वे स्थानकावर अजमेर-सोलापुर-अजमेर या गाडीचा थांबा दिला जावा का याची सखोल पडताळणी केली.
अहवालानुसार, आपली मागणी व्यवहार्य असल्याचे दिसुन आले असुन पुढील आवश्यक कार्यवाही साठी दि 6 मार्च 2025 रोजी मध्य रेल्वे मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांना सदर अहवाल पाठवला असल्याचे या पत्रातुन सांगितले आहे.
यामुळे आता अजमेर -सोलापूर- अजमेर एक्स्प्रेसला जेऊर येथे थांबा मिळण्याच्या कामाला गती आली आहे. आमदार नारायण पाटील यांनी आमदार पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर निवडणुकीपुर्वी जनतेने अथवा नागरिकांनी मांडलेल्या एका एका मागणीवर काम करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार दळण वळणाची सोय, सिंचन, वीज आणि आरोग्य या बाबत आमदार नारायण पाटील दाखवत असलेल्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतूक केले जात आहे. तर मध्य रेल्वे मुख्यालय मुंबई येथेही स्वतः आमदार नारायण पाटील हे तेथील वरीष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी दिली.