योगेश मारणे
न्हावरे, ता. २६ : न्हावरे(ता.शिरूर )येथील श्री मल्लिकार्जुन कावड सोहळ्याचे महाशिवरात्र उत्सवानिमित्त ढोल ताशांच्या गजरात हर-हर महादेवाच्या जयघोषात रांजणगाव सांडस-वाळकी संगम बेट येथील श्री संगमेश्वराकडे मोठ्या उत्साहात प्रस्थान झाले. आज(दि.२६)सकाळी येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्रींचा महाभिषेक पार पडला. त्यानंतर श्री मल्लिकार्जुन कावड मिरवणूक सोहळ्याला प्रचंड उत्साहात सुरूवात झाली. याप्रसंगी परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, भक्तजन व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला.
दरम्यान, श्री मल्लिकार्जुन भजनी मंडळाचा सुश्राव्य संगीत भजनाचा कार्यक्रमही यावेळी पार पडला. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने श्री मल्लिकार्जुन महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती, श्री मल्लिकार्जुन मंदिरात दिवंगत बेबीताई बोथरा यांच्या स्मरणार्थ सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक विकासशेठ बोथरा यांच्या वतीने दिवसभर भाविकांसाठी खिचडीचे आयोजन केले होते. तसेच महादेवनगर(रानातला महादेव) या ठिकाणीही भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. येथील मंदिरात राजेंद्र कांगुने यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले.
आज(दि.२६)रात्री येथीलच रानातील महादेव मंदिरात हभप.भरत महाराज थोरात यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून, शिवलीला अमृत ग्रंथ पारायण पार पडले.त्याचप्रमाणे विद्युत रोषणाईसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.