लोणी काळभोर, ता. 6 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर ते कवडीपाट टोल नाका या दरम्यानच्या अतिक्रमणांवर पुणे मनपा व पीएमआरडीएने संयुक्तरीत्या सोमवारपासून (ता. 3) कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईला आज गुरुवारी (ता.6) तीन दिवस उलटले असून सध्या ही कारवाई चालू आहे. मात्र अतिक्रमण धारकांनी जशी जशी कारवाई पुढे सरकली तशी तशी पुन्हा अतिक्रमणे करून दुकाने रस्त्यावरच थाटण्यास सुरवात केली आहे. म्हणून अतिक्रमणाची कारवाई म्हणजे ‘पुढचे पाठ अन् मागचे सपाट’ अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर हडपसर ते यवत या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. महामार्गाच्या पुटपाथ पासून 30 फुटांवरील अतिक्रमणे हटविण्यात येत आहे. रस्त्यावरील हॉटेल, टपरी, दुकाने यांची अतिक्रमणे जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहेत. हडपसर वैभव थेटरच्या जवळ, 15 नंबर, लक्ष्मी कॉलोनी, मांजरी, शेवाळवाडी, फुरसुंगी फाटा, कवडीपाट टोल नाका या दरम्यान कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईची सुरवात हडपसर येथील वैभव थिएटर येथून झाली आहे.
दरम्यान, शेवाळवाडीत महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यापारी व व्यावसायिकांनी चिकन, मटणाच्या अनधिकृत टपऱ्या रस्त्यावरच थाटलेल्या होत्या. त्यामुळे ही दुकाने निघणार कि नाहीत? याबद्दल सर्वत्र चर्चा होती. मात्र महापालिकेने या अनधिकृत दुकानांवरही कारवाईचा हातोडा उगारला आहे. आणि ही दुकाने पाडून टाकली आहे.
अतिक्रमण विभागाची कारवाई सध्या फुरसुंगी फाट्याजवळ येऊन पोहचली आहे. पण पाठीमागे पुणे-सोलापूर महामार्गाच्या रस्त्यावरही पुन्हा दुकाने सजू लागली आहेत. ही अतिक्रमण कारवाई नावापुरतीच होत असून, अशा अतिक्रमण करणाऱ्यांच्या मनात कुठलाही धाक राहीलेला नाही. कारवाई झाली तरी तासाभरानंतर परत त्याच रस्त्यांवर ‘जैसे थे’ स्थिती होत असल्याने, एकूणच या कारवाईबद्दलच नागरिकांमधून शंका व्यक्त करण्यात येत आहे.
महामार्ग मोकळा श्वास कधी घेणार?
हडपसर ते कवडीपाट टोल नाका या दरम्यान अनेक ठिकाणी महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत असून वारंवार कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे. जरी महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सुरु असली तरी नागरिकांनी पाठीमागे पुन्हा दुकाने बांधण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे महामार्गावरील समस्या पुन्हा जैसे थे होणार असल्याने महामार्ग मोकळा श्वास कधी घेणार? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.