शिरुर, ता. 22 : शेतजमीनीच्या ताब्यावरून दोन गटात वाद होऊन राडा झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे घडली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात महिला बाऊन्सरसह 22 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वढू बुद्रुक येथील प्रकाश वाढाणे यांची वडीलोपार्जीत जमीन आहे. प्रकाश यांच्या सावत्र आई यशोदा वाढाणे यांनी फसवणूक करत जमिनीत नाव लावून घेतले होते. त्यामुळे हा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने याचा दावा न्यायालयात सुरु आहे.
या जमिनीमध्ये काही महिला बाऊन्सर व युवकांनी येऊन ट्रॅक्टरच्या सहाय्याने पिकांचे नुकसान करत जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तेंव्हा त्यांच्यात वादावादी होऊन दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात महिला बाऊन्सरसह परस्पराविरोधी गटातील 22 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान, शेतजमीनीच्या ताब्यासाठी महिला बाऊन्सरचा शिरूर तालुक्यात सर्रास वापर होत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने जमिनीचे वाद विकोपाला जाऊ लागले आहेत. तर काही ठिकाणी मोठी वादावादी होऊन जमिनीचे ताबे मिळवण्यासाठी महिला बाऊन्सरसह संघटनांचा वापर होत आहे. तर काही ठिकाणी दोन गटात हाणामारीसारख्या घटना घडत आहेत.