अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती: शिरूर तालुक्यातील करडे येथे पैशाच्या वादावरून पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. दीपक संपत नवले ( वय 23 रा. करडे ता. शिरूर) या तरुणाला जेरबंद करण्यात आले आहे. याबाबत महेश रोडे (रा, करडे ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता करडे गावात महेश रोडे व दीपक नवले यांच्यात प्लॉटिंगच्या व्यवहाराच्या पैशावरून वादविवाद झाला. तेंव्हा दीपक नवले याने फिर्यादी महेश रोडे यांच्यावर पिस्तूल रोखून व पिस्तूल मागे पुढे करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली असल्याने, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते.
त्याप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता आरोपी दीपक नवले हा करडे गावात येणार असल्याची गोपनीय माहिती या पथकाला मिळाली. पथकाने करडे गावात जाऊन आरोपीला मोठ्या सीताफिने अटक केली असून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस सापडले. आरोपी दीपक यांनी हा गुन्हा केल्याची कबूल दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आरोपी दीपक नवले याला शिरूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.