पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे सापडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर विद्यार्थिनींची सुरक्षा व त्यांचे शैक्षणिक भवितव्य लक्षात घेऊन पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याकरिता विद्यापीठ प्रशासन सतर्क झाले आहे. या घटनेत तक्रारदार विद्यार्थिनीला खोली बदलून देण्यात आली होती. तसेच शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थिनीचे समुपदेशन करून सक्त ताकीद देण्यात आल्याचे मुख्य वसतिगृहप्रमुखांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.
विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात किंवा मोकळ्या जागेवर दारूच्या बाटल्या आढळल्याचे प्रकार यापूर्वी वारंवार समोर आले. मात्र, विद्यार्थिनींच्या वसतिगृहात दारूच्या बाटल्या आणि सिगारेटची पाकिटे आढळून आल्याने विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. वसतिगृहातील या प्रकाराबाबत एका विद्यार्थिनीने विद्यापीठाकडे तक्रार केली होती. काही विद्यार्थिनींच्या खोलीत दारूच्या बाटल्या व सिगारेटची पाकिटे आढळली असून, बळजबरीने मद्यप्राशन केले जात असल्याचा आरोप या विद्यार्थिनीकडून करण्यात आला होता. तसेच वसतिगृह प्रमुखांकडून कारवाई होत नसल्याने या विद्यार्थिनीने थेट कुलगुरू व कुलसचिवांनाच पत्राद्वारे कारवाईची मागणी केली होती.
याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासनाने खडबडून जागे होत विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अशा घटना पुन्हा घडू नये, याकरिता सतर्क राहणार असल्याचे कळवले आहे. वसतिगृहप्रमुख म्हणाले, तक्रार प्राप्त होताच संबंधित विद्यार्थिनींचे समुपदेशन आणि वर्तन सुधारण्याच्या दृष्टीने कारवाई केली होती. तसेच या विद्यार्थिनींना सक्त ताकीद देण्यात आली होती. या विद्यार्थिनींच्या पालकांना कारवाईबाबत अवगत करण्यात आले होते. त्याचप्रमाणे तक्रारदार विद्यार्थिनीला दुसऱ्या इमारतीत खोली बदलून देण्यात आली.