डोर्लेवाडी (पुणे) : संत तुकाराम महाराज विद्यालय डोर्लेवाडी, येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाने उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचवला. या शानदार कार्यक्रमाचे उद्घाटन छत्रपती शाहू हायस्कूलचे प्राचार्य गणपत तावरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी संगीत विशारद हरीश सुळे सर, संस्थेचे उपाध्यक्ष शंकर जगताप , उपसरपंच राणिताई नेवसे, पोलीस पाटील मा. नवनाथ मदने, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी आबा जगदाळे, शशांक अरणीकर, नितीन चलाक, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा सचिव विनोद जगताप, प्रगतशील बागायतदार चक्रपाणी जगताप , कुमार देवकाते, तानाजी गाडे, किशोर बागडे, शाहू हायस्कूलचे शिक्षक दयाराम राजगुडे, पप्पू वाडकर, सागर शहा तसेच पालक प्रतिनिधी पांडुरंग घोडे, तुकाराम बनकर, जयवंत निंबाळकर, सलोनी शहा, किशोरी भोसले, सिंधू टेबरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध नृत्यप्रकारांपासून ते साहसी सादरीकरणांपर्यंत आपली कला सादर केली. स्केटिंग डान्स, कराटे प्रात्यक्षिके, आणि मर्दानी खेळाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. छत्रपती संभाजी महाराज थीम, थरार जंजिऱ्याचा, आणि आर्मी थीमवरील सादरीकरणांनी उपस्थितांच्या मनावर गारूड केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेत कुशलतेने केले, ज्यामुळे त्यांच्या भाषिक कौशल्याला भरभरून दाद मिळाली. मुख्याध्यापिका सुषमा महादेव काळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. त्यांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी बाहेर जावे लागते, ही अडचण लक्षात घेऊन संस्थापक अध्यक्ष महादेव काळे यांनी शैक्षणिक वर्ष २५-२६ पासून ११वी व १२वीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण त्यांच्या गावातच उपलब्ध होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावर उपस्थित ग्रामस्थ व पालकांनी विद्यार्थ्यांची ही अडचण दूर केल्याबद्दल संस्थापक काळे, मुख्याध्यापिका काळे व विद्यालयाचे कौतुक केले व आभार व्यक्त केले.संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष. महादेव शामराव काळे यांनी आभार प्रदर्शन करत, कार्यक्रमातील सर्व सहभागींना त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद दिले.
या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक आणि विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ग्रामीण भागातील शाळेने सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उच्च दर्जाचेआयोजन सादर केल्याबद्दल उपस्थितांनी विद्यालयाचे कौतुक केले.
संत तुकाराम महाराज विद्यालय डोर्लेवाडीने आपल्या गुणवत्तेची परंपरा पुढे नेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श घालून दिला आहे.