पुणे : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबल्या आहेत. येत्या एप्रिल किंवा मे महिन्यात या निवडणुका पार पडतील, अशी शक्यता आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत रामदास आठवले म्हणाले, पुणे शहरात जागोजागी आमच्या शाखा आहेत. त्यामुळे भाजपने जरी स्वबळाचा नारा दिला, तरी त्यांना पुणे महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्यामुळे आम्ही पालिका निवडणुकीतही भाजपसोबतच राहणार आहोत.
तसेच महायुतीमध्ये रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदावरून वाद सुरू असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा प्रश्न मार्गी लावतील, असे सांगत राज्य मंत्रिमंडळात जी एक जागा रिक्त आहे, त्या जागेवर आरपीआयला मंत्रीपद द्यावे, अशी मागणीही आठवले यांनी केली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकार देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी प्रयत्नशील आहे. या प्रकरणाशी संबंधित घटनेत वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सर्व घटनांचा तपशील बघितला तर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा संबंध कराडशी असल्याने त्याच्यावर फक्त खंडणी नाही, तर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.