लोणी काळभोर : विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहराला नागरीक चांगल्या भावनेने बघतात. देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात येतात. मात्र, याच विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातील लोणी काळभोर परिसरात नववीच्या विद्यार्थिनीचा चार जणांनी विनयभंग केल्याची घटना शनिवारी (ता. 30) उघडकीस आली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर लोणी काळभोर पोलिसांनी तीन आरोपींना तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चार जणांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार जणांच्या विरोधात विनयभंगासह बाललैंगिक अत्याचार कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑक्टोंबर ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत ही 14 वर्षाची असून ती लोणी काळभोर परिसरातील एका नामांकित शाळेत नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. पिडीता आणि चार आरोपींपैकी एकाची काची स्नॅपचॅट अॅप ओळख झाली. त्यानंतर आरोपी व पिडीता त्या app च्या माध्यमातून बोलू लागले. त्यानंतर आरोपीने पिडीतेचे अश्लीश फोटो गुपचूप काढून घेवून त्याच्या मित्रांना पाठवून दिले.
त्यानंतर आरोपीच्या मित्रांनीही पिडीतेला फोटो दाखवून मैत्री करण्यास भाग पडले. तसेच पिडीतेला वरील चारही आरोपी फोटो पाठवून वारंवार त्रास देत होते. या त्रासामुळे पिडीता मानसिक दबावाखाली गेली. पिडीतेच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने चार जण त्रास देत असल्याचे सांगितले.
आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पॉस्कोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच, लोणी काळभोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना एका तासाच्या आत मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. तर यातील एक आरोपी फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे करीत आहेत.
दरम्यान, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी कायद्यात अनेक दुरुस्त्या करून कठोर कायदा करण्यात येत असला, तरीही विकृत मनोवृत्तीवर उपाय नसल्याने पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर देशभर महिला व मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे महिला व मुली अजूनही सुरक्षित नाहीत का? असा सवाल तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.