पुणे: संगीत क्षेत्रासह युवकांमध्ये प्रिय असलेल्या यो यो हनी सिंग यांच्या खराडीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात झालेल्या गोंधळाला आवर घालण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला. यासंदर्भात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खराडीतील महालक्ष्मी क्रिकेट मैदानावर या संगीतरजनीसाठी ऑनलाईन तिकिटे उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी (दि. १४) सायंकाळी तेथे क्षमतेपेक्षा अधिक गर्दी उसळल्याने भयंकर गोंधळ माजला. आयोजक संस्थेच्या प्रतिनिधींनी व बाऊंसर्सनी नियंत्रण आणण्याचा केलेला प्रयत्न असफल झाला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तेथील उडालेला गोंधळ व परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांची मोठी कुमक मागवण्यात आली. या अनावर गर्दीला आवर घालण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीमार करावा लागला.
या संगीतरजनीसाठी हजारोंच्या संख्येने तरुणाईची गर्दी उसळली होती. मात्र, हनी सिंग याचा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच बसण्याच्या जागेवरून तेथे एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणल्यावर ही रजनी पार पडली. यासंदर्भात आयोजक संस्थेच्या प्रतिनिधींकडून पोलिसांनी माहिती संकलित केली असून चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकाराची नोंद करण्यात आली आहे.