पुणे: पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) चालू आर्थिक वर्षासाठी अधिक मालमत्ता कराचे उद्दिष्ट समोर ठेऊन सुमारे २,२२९ कोटी रुपयांची रक्कम जमा झाल्याचे सांगितले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी महापालिकेने २,०७९ कोटी रुपयांचे मालमत्ता कराच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले होते. तथापि, महापालिकेने ठरवलेल्या रकमेच्या १५० कोटी रुपयांनी अधिक म्हणजेच एकूण २,२२९ कोटी रुपये कर उत्पन्न जमा झाला आहे.
पीएमसी हद्दीतील नव्याने विलीन झालेल्या गावांनी मालमत्ता कर उत्पन्नात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याने पुणे महानगरपालिका ठरवलेले उद्दिष्ट अधिक चांगल्या प्रकारे साध्य करू शकली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन जोडल्या गेलेल्या या भागातून ४१४ कोटी रुपयांचा मिळकतकर जमा झाला आहे. फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावातून सर्वाधिक करदाते आहेत. पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता करात फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावातून अनेक करदात्यांनी कर जमा केला आहे. या गावांमधून ३५.२२ कोटी रुपये कर जमा झाला आहे.
दरम्यान, मागील आर्थिक वर्षात एक एप्रिल २०२३ ते २५ मार्च २०२४ या कालाधीत २ हजार १३६ कोटी ८ लाख २४ हजार ६३४ कोटींचे कर जमा झाले होते. यंदा हि रक्कम वाढल्याचे दिसून येत आहे.
थकीत कर लवकरात लवकर जमा करून घेण्यावर पीएमसी लक्ष केंद्रित करणार
आर्थिक वर्ष संपत येत असल्याने, पीएमसी आता मालमत्ता धारकांकडून थकीत कर वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करेल. शेवटचे 5 दिवस राहिल्याने मिळकतकर जमा करण्यासाठी सुमारे चारशे कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान महापालिके समोर आहे. थकीत कर वसूल करण्यासाठी महापालिकेने विशेष पथके तयार केली आहेत आणि मालमत्ता मालकांनी कर भरला नाही तर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.