न्हावरे(पुणे): सादलगाव ता. ( शिरूर ) येथील नंदकुमार भगवान जठार व झुंबरबाई गणपत साळुंके या दोन घरातील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले.एकूण सहा लाख ६१ हजार ७८० रुपयाचे सोने यावर चोरांनी डल्ला मारला आहे.
याबाबत नंदकुमार जठार व झुंबरबाई साळुंके यांनी मांडवगण फराटा पोलीस औट पोस्टमध्ये फिर्यादी दाखल केल्या आहेत. सादलगाव ता.शिरूर येथे (दि.२१) जानेवारी रोजी रात्री एक वाजायच्या सुमारास अज्ञात नचोरट्यांनी चोरी करताना अनेक ठिकाणच्या लाईट बंद केल्या होत्या व तसेच शेजारी राहणाऱ्या लोकांच्या घराचे बाहेरून दरवाजे कड्या लाऊन बंद केले होते.या घटनेमध्ये दोन घरामध्ये चोरी झाली आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, झुंबरबाई गणपत साळुंखे हे घरी नसताना घरामधील सोने अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. त्यानंतर चोरट्याने पुढे शेजारी राहणारे नंदकुमार जठार यांच्या घरातील कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला व कपाटामधील सोने लंपास केले.
अज्ञात चोरटे चोरी करत असताना नंदकुमार जठार यांना आवाज आला परंतु, घराच्या बाहेर कशाचा तरी आवाज आल्याने घरामधूनच खिडकीजवळ येऊन पाहिले तर कोणी दिसले नाही.पण बंद असलेल्या खोलीमध्ये कपाटाचा आवाज येत होता.त्यानंतर नंदकुमार जठार यांनी त्यांच्या पत्नीला झोपेतून उठविले व घरामधून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला परंतु बाहेरून चोरांनी दरवाजे बंद केले होते.
त्यानंतर दरवाजा न उघडल्याने नंदकुमार यांनी भाऊ राजेंद्र जठार यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी दरवाजा उघडला घराबाहेर आल्यानंतर पहिले तर शेजारच्या बाजुच्या खोलीतील कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कोयंडा तोडून कपाटातील सर्व वस्तू अस्ताव्यस्त केल्या होत्या. कपाटातील सोने घेऊन चोर उसाच्या शेतामधून पसार झाले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला तसेच चोरी झालेल्या ठिकाणी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी पाहणी केली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.