पळसदेव(पुणे): यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२४-२०२५ अंतर्गत आयोजित खेड ( राजगुरुनगर ) येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्तीच्या ( पळसदेव) मुलींच्या संघाने खेड बारामती संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात जुन्नर संघावर चार गुणांनी विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
खो खो सामन्यात लहान गट मुली प्रथम क्रमांक तर लहान गट मुलांच्या संघाने सामन्यात तृतीय क्रमांक मिळवत सर्वांची मने जिंकली. जिल्हास्तरीय मुलांच्या खो खो संघाचे प्रतिनिधित्त्व सार्थक बनसुडे तर मुलींच्या संघाचे प्रतिनिधित्व अक्षरा बनसुडे यांनी केले .
ग्रामपंचायत पळसदेव, मधला मळा, माळेवाडी, शिंदे वस्तीशाळा व्यवस्थापन समिती ,शिंदेवस्ती तरुण मित्र मंडळ यांच्या वतीने विद्यार्थ्यांची भव्य अशी मिरवणूक पळसदेव गावातून काढण्यात आली. तसेच यथोचित सत्कार करण्यात आला. शिंदेवस्ती २८ पटाची शाळा असून या शाळेच्या संघाने तालुका व जिल्हा स्पर्धेत उत्तम यश मिळवत मुले-मुली दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून ते सर्वांच्या कौतुकाचा विषय बनले आहेत.
पुणे जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, इंदापूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. सर्व ग्रामस्थ पदाधिकारी पालक यांनी भव्य दिव्य मिरवणूक काढत विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक राहुल कानगुडे, मुख्याध्यापक उन्मेष कुचेकर यांचा सत्कार केला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बनसुडे, दत्तात्रय व्यवहारे, अंकुश बनसुडे, कैलास भोसले, ग्रामपंचायत सदस्या अंजनाताई बनसुडे, धनंजय बनसुडे, विशाल बनसुडे, सुभाष बनसुडे , नितीन बनसुडे, कांचन रणपिसे, किरण काळे आदिंसह पालक उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.