शिरूर (पुणे): अन्नापूर (ता.शिरूर) येथे गावात भर दिवसा हातात कोयता घेऊन मोठं-मोठ्याने आरडाओरडा करणाऱ्या माथेफिरू स्वयंघोषित “मायाभाई” याला शिरूर पोलिसांनी काल (दि.१८) अटक केली आहे. मायाभाई उर्फ गोविंद शरद जगताप(वय-३६वर्ष,मु.पो-अन्नापूर, ता.शिरूर,जि-पुणे)असे शिरूर पोलिसांनी अटक केलेल्या माथेफिरूचे नाव आहे.
या घटनेबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवारी(दि.१७) सायंकाळी पाच वाजायच्या सुमारास शिरूर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार शरद वारे यांना एका अज्ञात इसमाने फोन केला की,अन्नापुर येथे एक माथेफिरू गावात रस्त्याने हातात कोयत्यासारखे हत्यार घेवून जोरजोरात ओरडत असून, दहशत पसरवत आहे. त्यामुळे रस्त्याने येणारे-जाणारे नागरीक, लहान मुले व वयस्कर व्यक्ती घाबरले आहेत.
त्यानंतर शिरूरचे ठाणे अंमलदार शरद वारे यांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला व पेट्रोलिंग करत असलेल्या टीमला सदर ठिकाणी जाऊन संबंधित व्यक्तीस ताब्यात घ्या,असे सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथासाहेब जगताप, पोलीस अंमलदार निखिल रावडे, पो. कॉ.अजय पाटील हे दोन पंचांसह अन्नापूर येथील संबंधित ठिकाणी गेले व माथेफिरू स्वयंघोषित ‘मायभाई’ याला अटक केली. त्याच्या हातातील धारधार कोयता जप्त करण्यात आला आहे.
या घटनेची फिर्याद पो.कॉ.अजय पाटील यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिली आहे. स्वयंघोषित ‘मायाभाई’ याच्यावर भारतीय हत्यार दंडसंहिता कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असे शिरूर पोलिसांनी सांगितले.
गावोगावी अनेक “मायाभाई” मोकाटच…..
शिरूर तालुक्यातील गावांमध्ये अनेक तरुण वैफल्यग्रस्त, व्यसनाधीन झालेले आहेत. तसेच तालुक्यात अवैधरित्या दारू सर्रास उपलब्ध होत असल्यामुळे दारू पिल्यानंतर अशा प्रकारचे स्वयंघोषित माथेफिरू “मायभाई” गावोगावी तयार झाले आहेत. त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रमुख प्रश्न निर्माण झाला असून, अशा माथेफिरूंवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
Thanks 🙏 to the Active Maharashtra Police Force