उरुळी कांचन, ता. 18 : पुणे शहरालगतच्या पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि पेरणेफाटा परिसरातील मोक्याच्या जमिनींवर सध्या अनधिकृत प्लॉटिंगचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी आता थेट ‘हेलिकॉप्टर राईड’सारखी अजब आमिषे दाखवली जात असून, या चकाकीच्या मागे फसवणुकीचे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासकीय डोळेझाक आणि दलालांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भविष्यात हा परिसर बकाल होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पुरंदरचा नियोजित विमानतळ, रेल्वेचे जाळे, बड्या शैक्षणिक संस्था आणि औद्योगिकरणाचा बागुलबुवा उभा करून ग्राहकांना स्वस्त प्लॉटचे स्वप्न दाखवले जात आहे. कोणतीही एन.ए. (NA) परवानगी नाही की ले-आउट मंजूर नाही, तरीही बेधडकपणे रस्ते, ड्रेनेज आणि कंपाउंड करून गुंठेवारी सुरू आहे. सोशल मीडियापासून ते गल्लीबोळातील होर्डिंग्जपर्यंत जाहिरातींचा पाऊस पाडला जात आहे.
पूर्व हवेलीतील एका बड्या व्यावसायिकाने तर मार्केटिंगची हद्दच ओलांडली आहे. प्लॉट खरेदी करणाऱ्या कुटुंबाला चक्क ‘हेलिकॉप्टर राईड’ देण्याचे आमिष दाखवले जात आहे. इतकेच नव्हे, तर ‘डोअर टू डोअर’ मार्केटिंग करून आकर्षक भेटवस्तू वाटल्या जात आहेत. या झगमगाटामुळे सर्वसामान्य नागरिक कागदपत्रांची पडताळणी न करताच कष्टाची पुंजी या अनधिकृत जाळ्यात गुंतवत आहेत.
या अनधिकृत व्यवसायात गावागावातील स्थानिक नेतेमंडळी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणात शिरले आहेत. कमिशनच्या हव्यासापोटी शेतकऱ्यांकडून अल्प दरात जमिनी घेऊन त्याचे तुकडे पाडले जात आहेत. जमीन खरेदी-विक्रीच्या वादातून पूर्व हवेलीत गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
लोणी काळभोर, उरुळी कांचनला वाढले प्लॉटिंग व्यावसायिक
लोणी काळभोर, सोरतापवाडी, शिंदवणे व उरुळी कांचन परिसरात परवानगी न घेता शेतीजमिनींचे लहान-लहान प्लॉट पाडून विक्री केली जात आहे. काही ठिकाणी तर रस्ते, वीज, पाणी किंवा इतर मूलभूत सुविधा नसतानाही “रेसिडेन्शियल प्लॉट” म्हणून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. अनधिकृत प्लॉटिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढला असून शेतीजमिनींचे तुकडे करून विक्री करण्याचा प्रकार खुलेआम सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच पुरंदर तालुक्यात भविष्यात नव्याने होणाऱ्या विमानतळामुळे लोणी काळभोरसह परिसरातील अनेक नवीन प्लॉटिंग व्यावसायिक या ठिकाणी उतरले आहेत.







