पुणे: नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या वादात पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. गोळीबार करणाऱ्या आरोपींनी एकाला दांडक्याने बेदम मारहाण केली. जुनैद शेख असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली असता पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
गणेश संजय चैाधरी (वय 29), ओंकार अंकुश लांडगे (वय 25 , दोघे रा. वाडेबोल्हाई) असे आरोपींची नावे आहेत. आरोपींबरोबरच त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण प्रकरणी अजित महादेव जाधव (वय 26, रा. जाधव वस्ती, बकोरी, ता. हवेली) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मारहाणीत जुनैद शेख जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चौधरी आणि अजित जाधव यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी अजितने गणेशच्या कानशिलात लगावली होती. तेंव्हापासून गणेश हा अजितवर चिडलेला होता. हा वाद मिटविण्यासाठी गणेश चौधरी आणि अजित मित्रांना घेऊन गुरुवारी ( 13 मार्च) नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात आले. येथे आल्यानंतर रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास अजित आणि गणेश यांच्यात पु्न्हा हमरीतुमरी झाली. त्या वेळी आलेल्या चौघांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराच्या आवाजाने दाेन्ही गटातील तरुण घटना स्थळावरून पळून गेले. मात्र अजित जाधव याचा मित्र जुनैद शेख दुचाकीवर तेथेच थांबला होता. त्यावेळी त्याला दांडके व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक निरीक्षक रवींंद्र गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी गणेश आणि साथीदार ओंकार यांना अटक केली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध पोलिस घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी दिली.