पुणे : कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट 3 च्या पोलिसांनी कर्वेनगर येथील डिपी रोड परिसरातून अटक केली आहे. बंडया ऊर्फ सिध्दार्थ अनिल नागटिळक ( वय- 22, रा. कैलास मित्र मंडळजवळ साईनाथ वसाहत शास्त्रीनगर कोथरुड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी नागटिळक हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर कोथरुड व हिंजवडी पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. 25) गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक वारजे – माळवाडी पोलीस ठाणे हदीत गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार प्रतीक मोरे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सोमवारी (ता. 24) कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न करून फरार असलेला आरोपी बंड्या नागटिळक हा कर्वेनगर येथील डिपी रोडवर थांबलेला आहे.
मिळालेली माहिती वरिष्ठांना कळवुन युनीट ३ कडील अंमलदार यांनी बंडया नागटिळकला वेदात नगरी डी.पी रोड कर्वेनगर पुणे येथुन ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याचा खुनाच्या गुन्हयामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यास पुढील तपासकामी कोथरुड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. बंडया नागटिळक हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर कोथरुड व हिंजवडी पोलीस ठाणे येथे चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी पोलीस ठाणे विश्वजीत काईगडे व पोलीस निरीक्षक युनीट 3 गुन्हे शाखा रंगराव पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विनोद भंडलकर, विनोद जाधव, गणेश सुतार, हरिष गायकवाड, प्रतिक मोरे, इसाक पठाण यांनी केलेली आहे.