पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरी भांडण झालं, त्या रागाच्या भरात आपण घटस्फोट घेऊ असं म्हणून पत्नी, मुलांसह शिवाजीनगर न्यायालयात आलेल्या तरुणानं तिथेच झाडाला गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. हि घटना काल (शनिवारी, ता-8) सायंकाळच्या सुमारास घडली आहे. तरुणाने पत्नी आणि मुलांसमोरच पत्नीच्या ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल येनघुरे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सोहेल आणि त्याची पत्नी, दोन लहान मुलं हे पाषाण परिसरात वास्तव्यास आहेत. ते मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून पुण्यात वेठबगार म्हणून काम करतात. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहेलचे आणि त्याच्या पत्नीचे किरकोळ कारणांवरून वाद झाले होते.
शनिवारी त्यांची घरात टोकाची भांडणं झाली. त्यानंतर सोहेलने रागाच्या भरात पत्नीला आपण घटस्फोट घेऊ असं सांगितलं आणि त्यानंतर ते सर्व शिवाजीनगर न्यायालयात आले. शनिवारी न्यायालयीन कामकाज बंद असल्यामुळे न्यायालय आवारात गर्दी नव्हती. सोहेल, त्याची पत्नी आणि मुलांनी न्यायालय आवारात सोसायटी ऑफिसजवळील चिंचेच्या झाडाखाली जेवण केलं. त्यानंतर पुन्हा तिथे सुद्धा दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात सोहेलने पत्नीची ओढणी घेऊन पत्नी आणि मुलांसमोर चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.